काजीरंगा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील काजीरंगा येथे झालेल्या भव्य जाहीर सभेतून काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली. 'काँग्रेसची निगेटिव्ह पॉलिटिक्स देश नाकारत आहे. ज्या मुंबईत काँग्रेसचा जन्म झाला, तिथे आज ते चौथ्या-पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहेत', अशी टीका मोदींनी केली. या दौऱ्यात त्यांनी 6,957 कोटी रुपयांच्या काजीरंगा एलिव्हेटेड कॉरिडोरचे भूमिपूजन, तसेच दोन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
घुसखोरीवरून काँग्रेसवर थेट आरोप
पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या काळात आसाममध्ये घुसखोरी सातत्याने वाढली होती. काँग्रेसला आसामच्या इतिहास, संस्कृती आणि अस्मितेशी काहीही देणेघेणे नव्हते. त्यांनी आसामची माती घुसखोरांच्या हवाली केली होती. घुसखोरीमुळे लोकसंख्येचे संतुलन बिघडत असून, हे आसामसह देशाच्या सुरक्षेसाठी मोठे संकट आहे. घुसखोरांना वाचवा आणि त्यांच्याच मदतीने सत्ता मिळवा, हेच काँग्रेसचे धोरण आहे,' असे म्हणत त्यांनी बिहारमधील राजकारणाचाही उल्लेख केला.
भाजपा देशाची पहिली पसंती
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 'भारतीय जनता पार्टी ही आज देशातील मतदारांची पहिली पसंती ठरत आहे. बिहारमध्ये 20 वर्षांनंतरही भाजपाला विक्रमी मते, मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपाला मोठा जनादेश आणि केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये भाजपाचा पहिला महापौर बसला आहे. देशाचा मतदार आज गुड गव्हर्नन्स, विकास आणि वारशाचे जतन करणाऱ्या राजकारणाला पसंती देतो,' असे मोदी म्हणाले.
काजीरंगा फक्त राष्ट्रीय उद्यान नाही, तर आसामची आत्मा
काजीरंगा संदर्भात बोलताना पंतप्रधान मोदी भावनिक झाले. 'काजीरंगा माझ्या आयुष्यातील खास अनुभवांपैकी एक आहे. इथे मी रात्रभर मुक्काम केला आणि सकाळी हत्ती सफारी करताना या परिसराचे सौंदर्य जवळून पाहिले आहे. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान हे केवळ नॅशनल पार्क नाही, तर आसामची आत्मा आहे. युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. पर्यटन वाढल्यामुळे होमस्टे, गाईड सेवा, हस्तकला, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांतून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी मिळत आहेत' असेही त्यांनी नमूद केले.